आधुनिक उपजीविकेची साधने झाली मृत्यूच्या वाटा (in Marathi)

By मराठी रुपांतर - सुहास कोल्हेकर, मूळ लेखक अशीष कोठारी onJul. 18, 2016in Perspectives
फोटो : ऋचा चिटणीस

आर्थिक विकास आणि आधुनिकतेने उपजीविकांना केलंय मृत्युच्या वाटा (डेडलिहुडस्). हजारो वर्षांपासूनच्या पारंपारीक उपजीविका, ह्या अश्या जीवनपध्दती होत्या की ज्यांत काम आणि विश्रांती अशी तीव्र विभागणी नव्हती. आता त्या जागी आले आहेत केवळ कंटाळवाणे उत्पादन साखळीतले रोजगार. त्यांत आपण निराश होऊन वाट बघत असतो आठवडा संपण्याची आणि सुट्ट्यांची.

आपल्याला सांगण्यांत येते की, आर्थिक विकास म्हणजे प्राथमिक उत्पादक क्षेत्रातील रोजगारांपासून पुढे जात मोठ्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील काम मिळवणे. यामुळे भारतांत दोनत्रितिआंश लोकसंख्या म्हणजेच ७०० ते ८०० मिलिअन् (म्हणजे ७० ते ८० कोटी) लोक परिघावर ढकलले जातात.

परिणाम? …  हजारो शेतक-यांच्या मागील दशकभरातील महाभयंकर आत्महत्या किंवा तथाकथित विकासप्रकल्पांमुळे झालेले साठ मिलिअन् (म्हणजे सहा कोटी) लोकांचे त्यांच्या शेतांमधून, जंगलांमधून आणि किना-यांवरुन करण्यांत आलेले विस्थापन.

उद्योग, पायाभूत सुविधा आणि शहरे यांकरिता जमीनी आणि पाणी पळवण्यामुळे ज्या नैसर्गिक संसाधनांवर त्या स्थानिकांचे  जगणे आधारित आहे, त्या संसाधनांपासून त्यांना वंचित करण्यात आले. अनेकांचे होत असलेले शोषण सर्वांपुढे येत नाही, फारसे लक्षांतही घेतले जात नाही.

उत्पादन साखळीतले कंटाळवाणेपण…

समजा हे सारे अपरिहार्य आहे आणि हवेसेही आहे. पुढे गोष्ट अशी… शेतीचे आणि मासेमारीचे कंटाळवाणे काम करायचंय कुणाला ? पण त्याऐवजी आपण काय आणतो आहोत ?

गरीबांकरिता एकतर बेरोजगारी किंवा अनिश्चित, शोषणकारक व असुरक्षित रोजगार, जसे बांधकाम, खाणी, कारखाने, धाबे आणि अशा अन्य जागी. अशा ठिकाणी काम करतांना तिथे कंटाळवाणेपणा, तोचतोचपणा काही कमी होतो असे म्हणता येणार नाही. भारतातील साधारण ९३ टक्के रोजगार असंघटित क्षेत्रांत आहेत आणि त्यातील बहुतेक ठिकाणची परिस्थिती शोषणाचीच आहे.

आणि मध्यमवर्गाची व श्रीमंतांची स्थिती बरी आहे का?

पगाराच्या बाबतीत ते ब-याच चांगल्या स्थितीत आहेत.  नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, ५० टक्के खाजगी मालमत्ता ही केवळ १ टक्का भारतीयांच्या मालकीची आहे (ती देखिल अत्यंत कमी मजुरीच्या बदल्यांत मजूरांच्या कष्टानेच साठविण्यांत आलेली आहे).

पण कामाच्या दर्जाची स्थिती काय?

माहितीतंत्रज्ञान (आयटी) सारख्या आधुनिक क्षेत्रांतील बहुसंख्य हे विश्वभर विस्तारलेल्या एका उत्पादन चक्रातले जणू केवळ यांत्रिक दाते आहेत. पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत काँम्प्युटरच्या टरमिनलला लाचारपणे चिकटलेले किंवा काँलसेंटरवर रटाळ उत्तरे देणारे किंवा २४ तास, आठवडाभर निरंतर भडीमार करणा-या आधाशी वृत्तचँनल्सना बातम्या पुरवण्याकरितां हताशपणे धडपडणारे किंवा स्टाँकमार्केटच्या आकड्यांवर नजर रोखलेले असे सर्व. या उपजीविका ‘आमचे स्वातंत्र्य व उपजत सृजनशीलता दडपणा-या मृत्यूच्या वाटा नाहीत’, असे कुणीही प्रामाणिक व्यक्ति म्हणेल का?

जर वस्तुस्थिती अशी नसेल तर,कां बरं आपण इतक्या अस्वस्थपणे वाट बघतो की, कामाचा दिवस  कधी एकदाचा संपतो किंवा साप्ताहीक सुट्टी कधी मिळते ? मग आपल्याला ‘रीटेल थिअरपी’ची, किरकोळ खरेदीच्या उपचाराची, खरेदीला जाऊन उथळ आनंद मिळविण्याचा प्रयत्न करण्याची गरज कां पडते?

अर्थपूर्ण काम…

बेंगलूरुतील भूमी काँलेजमध्ये आणि पालमपूरच्या संभावना सारख्या पर्यायी शिक्षण केंद्रांमध्ये मी गेली काही वर्षे विकासाच्या मुद्यांवर सत्रे घेतो. या ठिकाणी सहभागी होणा-यांत आय् टी व्यवसायिक मोठ्या संख्येने आहेत, ज्यांना या क्षेत्रांतून बाहेर पडायचे आहे, काहीतरी अधिक अर्थपूर्ण करण्याकरितां.                       

माझ्या कामातून मला आनंद मिळतो म्हणून माझा हेवा वाटणा-या लोकांची संख्या मोजणे मी ब-याच पूर्वी सोडून दिले. या मंडळींना आता कळून चुकले आहे की, जरी ते हंडा भर धन (भरपूर पैसे) कमावित असले तरी ते काही त्यांची तत्त्वे आचरणात आणू शकत नाहीत. 

माझे काही असे म्हणणे नाही की सर्वच आधुनिक रोजगार ह्या मृत्यूच्या वाटा आहेत किंवा सर्वच पारंपारीक उपजीविका अगदी आनंददायीच होत्या. या दुस-या प्रकारातील असमानता, शोषण आणि अगदी तोचतोचपणा, कंटाळवाणेपणा यांची मला चांगली जाणीव आहे. मात्र, अर्थपूर्ण उपजीविकांची विचारपूर्वक निवड करायला हवी.

मी जे म्हणतो आहे त्याची रसरशीत उदाहरणे आहेत, डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी आणि टिंबक्टू कलेक्टिव्ह. त्यांनी मदतीचा हात दिला आणि पूर्वीच्या गरीब शेतकरी ग्रामीणांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावले (त्यांत समावेश आहे दलित महिला शेतक-यांचाही, ज्या आता स्वत: हातात कँमेरे घेऊन फिल्म सुध्दा तयार करू लागल्या आहेत आणि समाज नियंत्रित रेडिओ स्टेशनच्या व्यवस्थापकही झाल्या आहेत). दस्तकार आंध्र आणि झारक्राफ्ट यांनीही कुशल कारागिरांच्या उपजीविकांचे पुर्नरुज्जीवन केले आणि त्यांना नव्याने प्रतिष्ठा मिळवून दिली. आधुनिक क्षेत्रांतही काही दुर्मिळ अर्थपूर्ण व्यवसाय आहेत. उदाहरणार्थ ज्याला निसर्गांत रमायला आवडते, त्याला स्थानिक सजीवसृष्टी अभ्यासक बनता यावे. विद्यार्थ्यांमधील कला गुण उत्साहाने जो फुलवितो त्याला संगीत शिक्षक होता यावे किंवा स्वयंपाक करण्याची गोडी असलेल्याला सेंद्रीय अन्न शिजविणा-या  केंद्राचा प्रमुख होता यावे.

कष्टक-यांचा आदर करणे (श्रमप्रतिष्ठा ’ हे मूल्य मानणे)…..

प्रवाहाविरुध्दच्या अशा प्रयत्नांना रुजविण्याकरिता शिक्षणांत मूलभूत बदल होणे आवश्यक आहे. शाळा काँलेजांत आपला असा ग्रह करून देण्यांत येतो की, ‘बौध्दीक’ काम हे  कष्टाच्या कामापेक्षा श्रेष्ठ असते. त्यामुळे आपल्या मनाला  हात,पाय व हृदय यांची क्षमता वाढविणे ह्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली आहे.ज्यांचे यश निसर्गावर मात करणे आणि स्वत: यशाची शिडी चढतांना इतरांना खाली ढकलून देणे,यावर आधारलेले असते, अशाच ‘थोरांचे’ आदर्श आपल्यापुढे ठेवले जातात.

आणि म्हणून आपण मोठे होतो, ते प्राथमिक उत्पादकांना कमी मानतच! शेतक-यांच्या मालाला मिळणा-या भयावह कमी किमती, ह्या आपल्या बिघडलेल्या (विकृत) प्राधान्य क्रमांच्या दर्शक आहेत. आपल्याला जो जगवतो त्याला योग्य दाम आपल्याला द्यायचा नसतो, मात्र ब्रँडेड जोडे आणि उपभोगाच्या नवनव्या वस्तुंसाठी (यंत्रांसाठी) वाट्टेल तेवढे पैसे मुकाट्याने मोजण्याची आपली इच्छा असते.या दुस-या प्रकारांत ती वस्तु तयार करणा-या कारखान्यातील कामगाराला त्यातले प्रत्यक्ष किती पैसे मिळतात, हे बघण्याची देखिल आपल्याला अजिबात फिकिर नसते.

म्हणून दुसरा कळीचा बदल आवश्यक आहे तो आर्थिक क्षेत्रांत… जमीन आणि नैसर्गिक संसाधनांवर समाजाच्या अधिकाराची सुरक्षितता, उत्पादन पध्दतींवर कामगारांचे नियंत्रण आणि बाजारावर सामाजिक नियंत्रण. मी नुकतीच ग्रीस देशातील एका डिटरजंटस् (जंतुनाशक साबण बनविणा-या) कारखान्याला भेट दिली. काही दिवसांपूर्वी या कारखान्याचा ताबा कामगारांनी मिळवला आहे. आता ते तो कारखाना लोकशाही पध्दतीने चालवतात. यंत्रसामुग्रीत बदल करुन परिसंस्थांना, सजीवसृष्टीला सुरक्षित अशी, साबणासारखी उत्पादने ते तयार करतात आणि त्यांनी ग्राहकांसह आसपासच्या शहरी जनतेचे समर्थनही मिळविले आहे. आधीच्या भांडवलशाही मालकाच्या जोखडाखाली जगतांनाच्या तुलनेत, आता त्यांना त्यांच्या या नव्या जगण्यातून किती समाधान मिळते याबद्दल त्यांनी मला भरभरून सांगितले.   

पुढच्यावेळी वाहतुकीने गजबजलेल्या रस्त्यातून मेंढरे हाकतांना एखादा मेंढपाळ, धनगर दिसला की, असा विचार करा, ‘हो, कदाचित् लवकरच नष्ट होणारे ते, या काळांत अस्थायी वाटू शकतील. पण न जाणो उद्या हीच परिस्थिती आत्ताच्या आय टी किंवा डिजिटल मिडिया किंवा काँलसेंटरवरील रोजगारांची नसेल का?’ कदाचित् कृत्रिम बुध्दीचे पुढच्या पिढीतील यंत्रमानव आपल्यासारख्या काँम्प्युटरच्या पडद्यावर नजर असलेल्यांकडे बघत कुत्सितपणे हसत म्हणतील, किती अकार्यक्षम आणि जुनाट आहेत हे. फक्त बटनांवर नियंत्रण करणारे मोजके लोक वगळून, शेतकरी आणि मासेमारी करणारेच नव्हे तर संपूर्ण मानव जातच अस्थायी ठरेल कदाचित्. विज्ञानातील काल्पनिक गोष्ट? पण ब-याच वैज्ञानिक कल्पना आता प्रत्यक्षात तथ्य म्हणून पुढे आल्या आहेत.

आपले आदर्श पुन्हा तपासूयात…..

जिथे मानवच अस्थायी ठरेल, अशा भविष्यकाळांत पोहोचण्याआधी आपण गंभीरपणे काही पुनर्विचार करू शकूं. कदाचित् आपण नुसते माहिती तंत्रज्ञ (आय टी व्यवसायिक) किंवा लेख लिहिणारे न रहाता, आपल्यांत बदल करुन अधिक चांगली माणसं (/‘मानव’) बनूयांत, ही क्षमता आपल्यांत नक्कीच आहे.

आपण शेतक-यांना कदाचित् अशा सोयी उपलब्ध करुन देऊ शकू,ज्यामुळे ते  संशोधकही बनतील आणि फिल्म तयार करणारेही(जश्या डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीच्या महिला झाल्यांत)….कार्ल मार्क्सने कल्पना मांडलेल्या शिकारी, मासेमारी करणारा, धनगर आणि समीक्षक सर्व एकच व्यक्ति…याची थोडी बदललेली आवृत्ती. मला असे अनेक लोक माहित आहेत (ज्यांची नावे इथे लिहिली तर ते संकोचतील) जे यशस्वी संशोधक, शेतकरी, संगीतकार, पालक, जिज्ञासु या सर्वाचे समग्र रुप आहेत. त्यांनी काम आणि आराम, शारीरीक आणि मानसिक, जुने आणि नवे अशा सर्व खोट्या विभागण्या मोडीत काढल्या आहेत.

कल्पना करा, जर आपल्या मुलांपुढे असे आदर्श ठेवले गेले, जर अगदी लहानपणापासूनच आपल्याला ‘स्वावलंबी, जिज्ञासू, विविधतेचा आदर करणारे आणि सामाजिक जीवनांचा जबाबदार घटक’ असे होण्यास प्रोत्साहन दिले गेले तर? कल्पना करा की, आपण कामाची नव्याने अशी व्याख्या केली की ज्यांत आनंद आणि सुखाचाही समावेश असेल.

मला विश्वास आहे, असे नक्की होईल. तोपर्यंत आपण अशा जीवन पध्दतींचे निदान कौतुक तरी करु यांत, ज्यानी हजरो वर्षे पृथ्वीशी आदराचे नाते जोडले आहे, अशा नात्यांपासून दुरावा निर्माण करणा-या, आपल्यापैकी अनेकजण करत असलेल्या आधुनिक कामांपेक्षा वेगळ्याप्रकारे’. केवळ मूठभरांना श्रीमंत करणा-या उत्पादन साखळीतील एक मरगळलेला सदस्यच आपण व्हायचे आहे का?’, असा प्रश्न आपण स्वत.लाच विचारुयांत. चला,आपण शोधूया जुन्या आणि नव्या दोन्ही जीवन पध्दतीतील फक्त चांगले तेच एकत्र करुन, दोन्हीना अधिक अर्थपूर्ण आणि समाधान देणारे कसे करुं शकू. ही सुरवात असूं शकेल उपजिविकांना पुनर्जिवित करण्याची आणि मृत्यूवाटांना मागे सोडून देण्याची.    

मूळ लेखाचे प्रथम प्रकाशन – काउंटरकरंट्स, Scroll.in

Story Tags: , , , , , , , , ,

Leave a Reply

Loading...