जंगलाची पहारेकरीण ! (in Marathi)

By देवेंद्र गावंडेonOct. 23, 2015in Environment and Ecology
उषा मडावी यांच्यासह जंगल संरक्षण करणाऱ्या ग्रामस्थ महिला.
उषा मडावी यांच्यासह जंगल संरक्षण करणाऱ्या ग्रामस्थ महिला.

गोंदियामधील नानव्हा येथे राहणाऱ्या उषा मडावी या आदिवासी स्त्रीचे कर्तृत्व आहे ते जंगल वाचवण्याचे. अवैध वृक्षतोड आणि खनिजचोरीविरुद्ध रात्रीसुद्धा बेधडक गस्त घालणाऱ्या, त्यासाठी गावाला तयार करणाऱ्या उषाताईंनी ५०० एकर जंगलांचे रक्षण केले असून जंगलातील नदी व नाल्यातून वाळूचोरी बंद केल्याने अगदी उन्हाळ्यातही हे नदी, नाले वाहते राहू लागले आहेत. जंगल तोडायचे असेल तर आमच्या अंगावरून तुमचा ट्रक जाऊ द्या, असे बेधडक सांगणाऱ्या आजच्या दुर्गा उषा मडावी यांच्या कर्तृत्वाला आमचा सलाम!

राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्य़ातील उषा मडावी या आदिवासी स्त्रीने गेल्या सात वर्षांपासून सरकारी यंत्रणा, वाळू व दगडाचे ठेकेदार, गावातले धनदांडगे या साऱ्यांशी ‘पंगा’ घेत गावाच्या आजूबाजूच्या ५०० एकर जंगलांचे रक्षण केले आहे. इतकेच नव्हे तर जंगलातील नदी व नाल्यातून होणारी वाळूचोरी बंद केल्याने अगदी उन्हाळ्यातही हे नदी, नाले वाहते राहू लागले आहेत. अर्थात ही लढाई सोपी नव्हती, मात्र त्यातून मिळालेला विजय लखलखता आहे.

गोंदियापासून ६० किलोमीटरील सालेकसा हे तालुक्याचे गाव. येथून ४ किलोमीटर आत गेले की, उषाताईंचे नानव्हा गाव लागते. चार मुले, पती, एक कुडाची झोपडी आणि उदरनिर्वाहासाठी ४ एकर शेती गाठीशी. उषाताई तिसरी शिकल्या, मात्र मुलांनी शिकावे यासाठी ठाम होत्या. त्यातून त्यांचा मुलगा शैलेंद्र आज पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतो आहे, हे कौतुकास्पद आहे. उषा मडावींचे सारे आयुष्यच जंगलात गेले. आठ वर्षांपूर्वी गावात दारूबंदीसाठी दिलेला लढा यशस्वी ठरला. तेव्हा त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांची ओळख पहिल्यांदा गावकऱ्यांना झाली.

पाच वर्षांपूर्वी वन कर्मचारी सरकारी आदेशानुसार संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र अध्यक्षपद स्वीकारायला कुणीच तयार होईना. जंगलातून जळाऊ लाकडे आणणे, ती विकणे, वाळू, दगड, गिट्टी बाहेर काढणे, अवैध वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांना मदत करणे यात गावातील अनेकांचा सहभाग, त्यामुळे अध्यक्षपद नको, असा साऱ्यांचा सूर! मात्र अध्यक्ष गावातलाच हवा असल्याने, उषा मडावींचे नाव पुढे आले. जंगल लुबाडण्याच्या साऱ्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून असलेल्या उषाताईंनी ते ठामपणे स्वीकारले आणि त्या जिद्दीने कामाला लागल्या.

२४ जणांच्या समितीत अर्धेअधिक पुरुषच होते, पण कुणी सभेलाही यायचे नाही. अखेर उषाताईंनी स्त्री-सदस्यांनाच सोबत घेतले व रोज जंगलाची पाहणी सुरू केली. या पाहणीत जंगलाची कशी लूट सुरू आहे, याचे वास्तव समोर आले. अनेक कंत्राटदार विनापरवानगी जंगलातून गौण खनिज नेत आहेत, लाकूड व्यापारी सागवानाची झाडे तोडून नेत आहेत, अनेक ठिकाणी दगड, मुरूम व गिट्टीच्या खाणी आहेत. कधी ट्रॅक्टर, तर कधी ट्रक लावून खनिज व लाकडाची चोरी होत आहे आणि वनकर्मचारी व अधिकारी हातावर हात ठेवून शांत बसलेले आहेत, असे चित्र होते. उषाताईंनी या गैरप्रकारांना आळा घालण्याचे ठरवले. अशी चोरी करणाऱ्यांची वाहने अडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यातला धोका लक्षात येताच समितीतल्या पुरुषांनी माघार घेतली. तेव्हा पुन्हा एकदा उषाताईंनी मदत घेतली ती स्त्री-शक्तीची. अवैध मार्गाने होणाऱ्या चोरीचा महिषासुर ठार करण्यासाठी या दुर्गाशक्तीने एकबळावर लढायचे ठरवले.

बक्कळ पैसा असलेल्या या अवैध कामे करणाऱ्यांनी प्रारंभी उषाताई व त्यांच्या सहकाऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. तो फसला. नंतर काही गावकऱ्यांना हाताशी धरून मानसिक दबाव आणला गेला. त्यालाही त्या बधल्या नाहीत. अखेर वनकर्मचाऱ्यांकडून विचारणा झाली, तेव्हा उषाताई व वनखात्यात पहिली खडाजंगी उडाली. ‘शासनाच्या नियमानुसार काम सुरू आहे की नाही ते सांगा?’, या उषाताईंच्या प्रश्नाला हे कर्मचारी उत्तरच देऊ शकले नाहीत. काहीही केले तरी ही स्त्रीशक्ती ऐकत नाही, हे बघून चोरांनी दिवसाऐवजी रात्री जंगल चोरी करण्याचा निर्णय घेतला.

आता उषाताईंच्या नेतृत्वाची खरी कसोटी होती. त्यांनी रात्री जंगलात गस्त घालणे सुरू केले. या गस्तीला उषाताईंसोबत सुरुवातीला तीनच स्त्रिया होत्या. नंतर त्यांची संख्या सात झाली. स्त्रीवर्गाची ही जिद्द बघून गावातले काही पुरुषही मग गस्तीवर यायला लागले. या कामात उषाताईंना त्यांच्या पतीनेही खूप साथ दिली. रात्री जेवण झाले की, या स्त्रिया जंगलात निघायच्या, चोरीची वाहतूक करणारी वाहने अडवायच्या. यामुळे चोरी करणारे ठेकेदार, लाकूड तस्कर खूपच संतापले. वाद घालणे, भांडण उकरून काढणे सुरू केले. उषा मडावी व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गेल्या पाच वर्षांत एकूण नऊ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यातली दोन प्रकरणे न्यायालयात गेली. हे गुन्हे खोटे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आता या स्त्रियांची ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. त्यांच्या तक्रारी काय तर या स्त्रियांनी शिवीगाळ केली, ट्रॅक्टरमधले सामान चोरले. उर्वरित सात तक्रारींचे निवारण गावातल्याच तंटामुक्त समितीसमोर झाले. या वेळी काही ठेकेदारांनी त्यांची माफी मागितली. रात्री जंगलात जागता पहारा देणाऱ्या या स्त्रियांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला, पण उषाताई बधल्या नाहीत.

जंगलातून दगड, मुरूम व गिट्टी घेऊन जाणारी वाहने थांबली आणि या गावातल्या रस्त्यावरची धूळही गायब झाली. हा लढा देताना वनखात्याकडून उषा मडावींना आलेले अनुभव अतिशय वाईट आहेत. अनेकदा उषाताई जंगलातून होत असलेल्या चोरीची तक्रार घेऊन वनकर्मचारी व अधिकाऱ्यांकडे गेल्या, पण त्यांना दिवसभर बसवून ठेवणे, सायंकाळी निघून जायला सांगणे, असेच अनुभव आले. उषाताईंनी कर्मचारी व चोरटय़ांमधील संगनमतावरच बोट ठेवले. त्यामुळे चिडलेल्या या कर्मचाऱ्यांनी खात्यातर्फे सुरू असलेल्या कामावर त्यांना रोजगार देणेच बंद केले. तुम्ही जंगल सांभाळता मग काम मागायला कशाला येता, असा प्रश्न करून हे कर्मचारी त्यांची अवहेलना करू लागले.

पाच वर्षांच्या या वनरक्षणाच्या लढाईत आधी हेटाळणी करणारे गाव मात्र उषा मडावींच्या पाठीशी आता भक्कमपणे उभे ठाकले आहे. दैनंदिन वापरासाठी लागणारे जळाऊ लाकूड ही गावकऱ्यांची मुख्य समस्या होती. त्यावर तोडगा म्हणजे ही समितीच गावाला जळाऊ लाकडाचा पुरवठा करू लागली आहे. उषाताई व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आता या ५०० एकर जंगलातली चोरी जवळजवळ थांबली आहे. मौल्यवान सागवानाच्या झाडांनी समृद्ध असलेले हे जंगल आता आणखी घनदाट व डौलदार दिसू लागले आहे.

आणखी एक महत्त्वाचे काम त्यांनी केले ते म्हणजे याच जंगलातील नदी व नाल्यातून वाळू चोरणाऱ्यांनासुद्धा चाप लावला आहे. त्यामुळे
अगदी उन्हाळ्यातही हे नदी, नाले वाहते राहू लागले आहेत. त्याचा परिणाम जंगल समृद्ध होण्यात झाला आहे. जंगल वाचले तर माणूस वाचेल, या न्यायाने उषा मडावींचे हे माणूस वाचवण्याचे काम मोलाचे ठरते आहे.

संपर्क – रा. नानव्हा, ता. सालेकसा, जि. गोंदिया
९६७३५१२६४३
[email protected]
[email protected]

हा लेख प्रथम दै. लोकसत्ता मध्ये प्रकाशित केला गेला

Story Tags: , , , , , , ,

Leave a Reply

Loading...